श्वेता कोरगावकर : बांद्यात भाजपने दाखवले काळे झेंडे
*💫बांदा दि.०९-:* पालकमंत्री उदय सामंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री नसून बालकमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच खनिकर्म विभागाने दिलेल्या रुग्णवाहिका धूळ खात पडून आहेत. पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचा आम्ही जाहीरपणे निषेध करत असल्याचे जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर यांनी सांगितले. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका माघारि बोलावून घेण्यात आल्याने बांदा शहर भाजपच्यावतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सामंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, मकरंद तोरसकर, श्यामसुंदर मांजरेकर, भाऊ वळंजू, किशोरी बांदेकर, उमांगी मयेकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, महिला तालुकाध्यक्ष प्रियांका नाईक, बांदा शहर अध्यक्ष अवंती पंडित, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, श्याम सावंत, शानु नाईक, निलेश सावंत, दादू कवीटकर, गौरंग शेर्लेकर, समीर सावंत, सुनील धामापूरकर आदी उपस्थित होते. अक्रम खान म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढता आहे, या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिका केवळ आपल्या स्वार्थासाठी पालकमंत्री सामंत यांनी अडवून ठेवल्या आहेत. ही निषेधार्थ बाब असून हा कोरोना रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये येऊनही त्याचे काहीही सोयरसुतक नसलेले पालकमंत्री जबाबदारी झटकत आपल्या वेळेनुसार उद्घाटनाचा घाट घालत आहेत. हे राजकारण त्यांना शोभणारे नाही.
