ठाकरे सरकार सिंधुदुर्गातील एसटी चालक-वाहकांच्या जीवीताशी खेळत आहे

*जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई यांनी केला आरोप

*💫वेंगुर्ला दि.०४-:* मुंबईतील बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता ठाकरे सरकारने सिंधुदुर्गातील एसटी चालक वाहक यांना मुंबईत पाठवून कोरोनाच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. मुंबईमध्ये सेवा बजावणाऱ्या चालक वाहकांना राहण्यासाठी अस्वच्छ रुमची व्यवस्था तसेच एकाच रुममध्ये चार-चार कर्मचाऱ्यांना दाटीवाटीने रहावे लागते. परंतु नोकरी जाईल या भीतीपोटी चालक वाहक जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावत आहेत. ठाकरे सरकार सिंधुदुर्गातील एस.टी.चालक-वाहक यांच्या जीवीताशी खेळ खेळत असल्याचा आरोप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केला आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी ५० वर्षावरील चालक वाहक ड्युटी करणार नाही, असे सरकारला ठणकावून सांगीतल्यामुळे मुंबईची लाइफलाईन सुरळीत राहण्यासाठी ग्रामीण भागातील चालक वाहक यांना मुंबईत ड्युटी करावी लागत आहे. एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांनी ५० वर्षावरील चालक वाहक ड्युटी करणार नाही असे सांगितले. परंतु दुसरीकडे सिंधुदुर्गातील एसटी।प्रशासन ५० वर्षावरील चालक वाहकांना मुंबईला ड्युटी करण्यासाठी पाठवून त्यांच्या जीावीताशी खेळ खेळत आहेत. यामध्ये वेळीच वेतन न मिळाल्याने एसटी.कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. मुंबईला ड्युटी करुन सिंधुदुर्गात परत आलेल्या चालक वाहकांची कोरोना टेस्ट केली असता बरेच कर्मचारी पॉझिटीव्ह असल्याचे समजते. तसेच मुंबईत पंधरा दिवस सेवा बजाऊन आलेले चालक वाहकांना स्वॅब टेस्टसाठी तीन-तीन तास ताटकळत रहावे लागत आहे. या सगळ्या कारभाराविरोधात चालक वाहकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजपा-सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथे विभाग नियंत्रक यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारला जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page