Headlines

मोरयाचा धोंडा येथे २५ रोजी किल्ले सिंधुदुर्ग पायाभरणी वर्धापन दिन

मालवण (प्रतिनिधी)

मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीपूर्वी भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वायरी- दांडी येथील किनाऱ्यावरील ज्या पाषाणाची पूजा करून सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली त्या मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाचा ३६२ वा वर्धापन दिन दि. २५ नोव्हेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे साजरा होणार आहे.

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी वायरी दांडी भागातील समुद्रकिनाऱ्यावरील पाषाणावर श्री गणेशाची प्रतिमा कोरुन सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमीपूजन केले होते. याच ऐतिहासिक पाषाणाला मोरयाचा धोंडा (मोऱ्याचा धोंडा) असे संबोधले जाते. या ऐतिहासिक घटनेचा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे साजरा केला जातो. मोरायचा धोंडा म्हणजेच मोरेश्वर देवस्थाणास गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचे यश म्हणून तत्कालीन कोकण आयुक्त श्री. प्रभाकर देशमुख यांनी मोरयाचा धोंडा वर्धापन दिन दिवशी जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहून शासकीय पूजा करावी असे आदेशपत्र पत्र (संदर्भ: क्र/आक्रो/स्वीस/किल्ले/२७/२०१७) जिल्हाधिकारी कार्यालयास मिळवून दिलेले आहे.

दरवर्षीप्रमाणे बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रेरणोत्सव समितीमार्फत मोरयाचा धोंडा या पाषाणाचा ३६२ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. ​यावेळी सकाळी ८ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्री मोरेश्वराचे पूजन संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी याकार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, मालवण तर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page