शिवस्वराज्य गुढीची विटंबना केलेल्या व्यक्तीवर शासनाने येत्या आठ दिवसात गुन्हा दाखला करावा…_

सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना निवेदन

*💫कुडाळ दि.०७-:* तालुक्यातील ग्रामपंचायत हुमरमळा (वालावल) यांनी घालून दिलेल्या निर्देशाचे पालन न करता त्या ठिकाणी उपस्थित असलेले अतुल बंगे, सरपंच अर्चना अतुल बंगे, ग्रामसेवक अर्पणा पाटील यांनी स्वतः च्या पायात बूट घालून “शिवस्वराज्य” गुढीची विटंबना केली आहे तरी ह्या व्यक्तीवर शासनाने येत्या आठ दिवसात कार्यवाही करून गुन्हा दाखला करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाज कुडाळच्यावतीने कुडाळ तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, कुडाळ पोलीस निरीक्षक यांना निवेद ना द्वारे देण्यात आला. निवेदनात म्हटले की, राज्य शासनाने दिनांक ६ जून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यासाठी निर्देश दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साहात तोरण रांगोळी व सुंदर अशी गुढी उभारून साजरा करण्यात आला. शासनाने सर्व नियम व अटी लागू केल्या होत्या. शासनाच्या नियमाला अनुसरून हुमरमळा (वालावल) यांनी निर्देश घालून दिले होते. मात्र त्याचे पालन न करता अतुल बंगे, सरपंच अर्चना बंगे, ग्रामसेवक अर्पणा पाटील यांनी स्वतः च्या पायात बूट घालून “शिवस्वराज्य” गुढीची विटंबना केली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. येत्या आठ दिवसांत योग्य ती कार्यवाही नाही झाली तर मराठा स्टाईल दाखवून देऊ, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी मराठा समाजाचे भास्कर परब, मोहन सावंत, संध्या तेरसे, सुबोध परब, राजा धुरी, दादा साईल, नागेश आईर, संग्राम सावंत, संदेश नाईक, रुपेश कानडे, रत्नाकर जोशी, बंड्या सावंत, शैलेश घोगळे, निलेश परब, प्रथमेश परब, राजवीर पाटील, केदार राऊळ आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुडाळ मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील,असेही निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page