*💫कणकवली दि.०४-:* स्वामी रामदेव प्रणित पतंजली महिला समितीच्या कोकण प्रांत यांच्यावतीने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांसाठी ऑनलाइन सहयोग शिक्षक प्रशिक्षण (वर्ग-२) दि.२१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत सुरू आहे. सदर शिबिरामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई, पुणे, गोवा या भागातून एकूण ८३ प्रशिक्षणार्थी योगाचे उत्तम प्रशिक्षण घेत आहे. या शिबिराचा मुख्य हेतू जास्तीत जास्त समाजाला योगाच्या माध्यमातून निरोगी व आरोग्यसंपन्न बनवून कोरोनाच्या संकट काळात आत्मविश्वास देऊन निर्भय व व्याधीमुक्त समाजाचे नवनिर्माण करणे असा आहे. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी हाच उत्तम मार्ग ठरेल. सदर शिबिर सकाळी ०५.३० ते ०७.३० सायंकाळी ५ ते ७ या वेळेत असून या शिबिरामध्ये योगसाधकांना योग, प्राणायाम, जॉगिंग, सूर्यनमस्कार, मुद्रा, ॲक्युप्रेशर तसेच अष्टांग योग, प्राणायाम रहस्य, योगसाधना, योगचिकित्सा, अस्टचक्रातून ध्यानयोग, आयुर्वेद रहस्य, औषधी वनस्पती, विषमुक्त सेंद्रिय शेती, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम व रिसायकलिंग, कोरोनावरील उपचार पद्धती, संस्कृत योगसूत्र विवेचन, मधुमेह, मोटापा उपचार, सोशल मीडिया ट्रेनिंग अशा अनेक विषयांवर एकूण ९० तासिकांचे हे प्रशिक्षण देऊन परिपूर्ण सहयोग शिक्षक निर्मिती करणे हे लक्ष्य आहे. या शिबिरामध्ये पुरुष प्रशिक्षणार्थीना प्रवेश नाही. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णतः महिलांनी मार्गदर्शन व्यवस्थापन नियोजन केले आहे. पतंजली राज्य कार्यकारिणी सदस्या सौ.रमाताई जोग यांच्या नेतृत्वाखाली तीनही जिल्ह्यामधील पतंजलीच्या हरिद्वार प्रशिक्षित योगशिक्षिका या शिबिरात उत्तम मार्गदर्शन करत आहेत. हे दुसरे शिबिर असून यापुढील ऑनलाइन शिबीर जानेवारी २०२१ मध्ये सुरू होईल. इच्छुकांनी स्थानिक पतंजली योगसमितीशी संपर्क करावा. प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी राहूनच ऑनलाइन प्रशिक्षण घेता येईल.
महिला पतंजली योगसमिती कोकण प्रांताच्यावतीने महिलांसाठी ऑनलाईन योगशिबिर….
