ग्रामीण भागातही नवरात्रौत्सवनिमित्त भक्तिमय वातावरण

वेंगुर्ला
वेंगुर्ला शहरासह ग्रामीण भागात रविवारी काही ठिकाणी दुर्गामातेचे ताशांच्या गजरात वाजतगाजत व भक्तीमय वातावरणात आगमन झाल्यावर प्रतिष्ठापना करण्यात आली. वेंगुर्ला शहरात मातोश्री कला क्रीडा मंडळ दाभोली नाका, गाडीअड्डा मित्रमंडळ बाजारपेठ वेंगुर्ला, उद्धव ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वेंगुर्ला व कॅम्प कॉर्नर मित्रमंडळ वेंगुर्ला इत्यादी 4 ठिकाणी शहरात दुर्गामातेचे भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आले. तसेच तालुक्यातील शिरोडा, मठ शिवाजी चौक मित्रमंडळ येथे, म्हापण बाजारपेठ, दाभोली रेवणकरवाडी मित्रमंडळ आदी भागात दुर्गामातेचे विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. वेंगुर्ला ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून 9 दिवस विविध रूपात देवीची पूजा, धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तालुक्यातील सर्वच गावामध्ये श्री देवी सातेरी मंदिरामध्ये आज रविवारी देवीचे उत्साहात पूजन करण्यात आले. पुढील 8 – 9 दिवस
विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तसेच नवदुर्गा ठिकाणी दांडिया, भजने, होममिनिस्टर कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न होणार आहेत. त्यामुळे आठवडाभर वेंगुर्ला शहर तसेच ग्रामीण भागात मंगलमय, चैतन्यमय व भक्तिमय वातावरण राहणार आहे.
