कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली सीटीस्कॅन सेवा शासनाच्या धोरणानुसार मोफत असताना गेल्या महिन्याभरात सुमारे ३०० रुग्णांकडून पैसे घेण्यात आल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला. मोफत सेवा असताना रुग्णांकडून पैसे का घेतले जात आहेत, असा सवाल करत यापुढे एकाही रुग्णाकडून पैसे घेतल्यास शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांची भेट घेतली. यावेळी सीटीस्कॅन सेवेसाठी रुग्णांकडून घेतल्या जाणाऱ्या शुल्काचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, माजी युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, विलास गुडेकर, अजित काणेकर आदी उपस्थित होते.
क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून सीटीस्कॅन सेवा मोफत देण्याचे शासनाचे धोरण असताना रुग्णांकडून पैसे कसे घेतले जात आहेत, असा सवाल सुशांत नाईक यांनी केला. यावेळी डायग्नोस्टिक सेंटरच्या कर्मचाऱ्याला बोलावून घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात जवळपास ३०० रुग्णांकडून पैसे घेतल्याची बाब समोर आल्याचा दावा करण्यात आला.
याबाबत डॉ. पंकज पाटील यांनी शासनाच्या धोरणानुसार आयपीडी आणि ओपीडीमधील रुग्णांकडून सीटीस्कॅनचे पैसे घेऊ नयेत, असे आदेश असल्याचे स्पष्ट केले. मात्र, इतर बाहेरील खासगी रुग्णालयांतून येणाऱ्या रुग्णांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सर्व रुग्णांना समान पद्धतीने मोफत सीटीस्कॅन सेवा द्यावी, अन्यथा रुग्णालय प्रशासनाच्या कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने महिलांची गैरसोय
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. सोनोग्राफीची सुविधा केवळ दोन दिवस उपलब्ध होत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले. रिक्त पदांमुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला.
पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वी कणकवलीत सीटीस्कॅन सेवा जनतेला मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित कंपनीला मोफत सेवा देण्याबाबत पत्र दिले होते. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही मोफत सीटीस्कॅन सेवेसाठी मागणी केली होती. असे असतानाही रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याने पालकमंत्र्यांचे आश्वासन खोटे ठरल्याचा आरोप नाईक यांनी केला.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील तीनही रुग्णालयांची अवस्था बिकट असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नाही, सोनोग्राफीची सुविधा मर्यादित आहे आणि रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. “पालकमंत्री कणकवलीतील रुग्णालय सक्षम करू शकत नसतील, तर जिल्ह्याचे काय?” असा सवाल सुशांत नाईक यांनी केला.
दरम्यान, तालुकाप्रमुख राजू राठोड यांनीही रुग्णालयातील समस्यांवरून पालकमंत्र्यांवर निशाणा साधला. “ज्या पद्धतीने जुगारावर रेड मारली जाते, त्याच पद्धतीने कधीतरी उपजिल्हा रुग्णालयावरही रेड मारावी,” असा टोला त्यांनी लगावला.
