Headlines

सिंधुदुर्गातील दुष्काळी परिस्थितीत तातडीने पंचनामे करा…

आशिष सुभेदार यांची मागणी; अन्यथा शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलनाचा इशारा..

⚡सावंतवाडी ता.०१-:
सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाचा छायेत आहे तर आठही तालुक्यांमध्ये दुष्काळ जन्य परिस्थिती जाहीर झाली असून शासनाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात तसेच खरिप हंगाम पिक, भातशेती, बागायती यांच्या झालेल्या नुकसानिचे त्वरित पंचनामे करून त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

यावर्षी जिल्ह्यात बहुतांशी सगळीकडेच पाऊस कमी झाला आहे त्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेले भात पीक करपले आहे. काही ठिकाणी पिकांना बहरच आलेला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हा जिल्हा दुष्काळ ग्रस्त भाग म्हणून शासनाने जाहीर केला आहे तरी त्यावर योग्य त्या उपाययोजना करून शासनाने हे संकट थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. आवश्यक ठिकाणी बंधारे, बांध घालून पाणी अडवावे जेणेकरून पाण्याची समस्या कमी होईल. अजूनही पावसाचा हंगाम संपलेला नाही परतीचा पाऊस देखील अजून झालेला नाही परिणामी बंधारे घातल्यास पाणी अडवण्यास मदत होऊन काही प्रमाणात दिलासा मिळेल.
भात शेतीला पुरेसा पाऊस नसल्याने आणि तीव्र स्वरूपाच्या उन्हामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती करपून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार आहे. ठिकठिकाणी झालेल्या भात शेतीची मंत्री लोकप्रतिनिधी पाहणी करत आहेत मात्र फक्त पाहणी करून काही होणार नाही तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झाली पाहिजे असा टोला सुभेदार यांनी लगावला आहे.
राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देऊनही सिंधुदुर्गात अद्याप भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरु झालेले नाहीत. अधिकारी, महसूल व कृषी विभाग या परिस्थीतीला अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. सरकारने तातडीने सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसमवेत सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page