विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ५० हून अधिक कच्चे बंधारे; महाआरोग्य शिबिरांचाही महासंकल्प: पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती..

⚡सावंतवाडी, ता. १-: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबरमध्ये राबविण्यात आलेल्या ‘सेवा अभियानाचा’ पुढील टप्पा म्हणून भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘बुके, ना पोस्टर; बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी योगदान!’ हा संदेश देत लोकसहभागातून ५० हून अधिक कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसंधारणाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाऐवजी जलसंधारण आणि आरोग्यसेवेसारख्या समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला आहे.
