Headlines

ओंकार हत्तीला वनतारात पाठवा…

पालकमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करावा:माजी जि.प. सभापती मंगेश तळवणेकर यांची पालकमंत्री नितेश राणेंकडे मागणी..

⚡सावंतवाडी,ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीचे होत असलेले हाल पाहून दुःख होत असून, ओंकार हा आमच्यासाठी दैवतासमान आहे. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे वनतारात पाठविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याचे सुपुत्र व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार राणें तसेच मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना सोबत घेऊन ओंकारला वनतारात पाठविण्यासाठी मोहीम राबवावी, असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.ओंकारच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्याच्यावर नियमित देखरेखीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते आणि त्यासाठी शासनाचा मोठा खर्चही होत आहे. दुसरीकडे ओंकारच्या वावरामुळे बागायती व शेती करणाऱ्या नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे ओंकारला सुरक्षित अधिवास मिळाल्यास शेतकरी-बागायतदारांना दिलासा मिळेल, तसेच वन विभागाचे कर्मचारीही इतर कामांसाठी उपलब्ध होतील, असे तळवणेकर यांनी सांगितले.तिलारी येथे हत्तींसाठी प्रकल्प होणार असल्याचे समजते. मात्र, हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी सुरू होईल, हे स्पष्ट नाही. तोपर्यंत ओंकारला सुरक्षित ठिकाणी ठेवून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा येथे आणण्याबाबत विचार करता येईल, असेही त्यांनी सुचविले.ओंकार सध्या शांत आहे, याचा अर्थ तो भविष्यातही कायम शांत राहील असे नाही. त्यामुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून ठोस निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती तळवणेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page