Headlines

उन्हामुळे करपलेल्या भातशेतीची आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी…

कुडाळ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीचे आश्वासन:पंचनामे व मदत प्रक्रिया गतीने करण्याच्या सूचना..

⚡कुडाळ ता.२७-: पावसाचा अभाव आणि तीव्र उन्हामुळे कुडाळ तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातपिके करपून गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आज रानबांबुळी, कसाल, अणाव आणि पावशी येथील नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.
पाहणीनंतर बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पालकमंत्र्यांनी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी आवश्यक निर्देश दिले आहेत. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा अडथळा न आणता सरसकट मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात तातडीने मदत देण्यात येईल. त्यानंतर निकषानुसार एनडीआरएफ आणि केंद्र सरकारकडून मिळणारी मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही राणे यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. गरज भासल्यास टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. तसेच तळी, बंधारे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असून, आवश्यक कामांसाठी पालकमंत्र्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात जिल्हा उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, रुपेश कानडे, सुप्रिया वालावलकर, राजन परब, काका कुडाळकर, मिलिंद नाईक, तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले, प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page