Headlines

कुडाळ न.पं.तर्फे ‘सेवा संकल्प अभियान’; शहरात भव्य बाईक रॅली

कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ कुडाळ नगरपंचायतीतर्फे उत्साहात सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत २३ सप्टेंबर रोजी शहरातून भव्य जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली.
‘विकसित भारत २०४७’ या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, तसेच स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, डिजिटल साक्षरता आणि लोकसहभागाबाबत जनजागृती करणे हा रॅलीचा उद्देश होता.
कुडाळ शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पवळ, नगराध्यक्षा, नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. युवकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. रॅलीदरम्यान विविध योजनांची माहिती आणि जनजागृतीपर संदेश देण्यात आले.
अभियानांतर्गत नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ‘स्वच्छता ही सेवा’, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, जलसंधारण आणि जलस्रोत स्वच्छता यांसह विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आगामी काळात वृद्धाश्रम भेट, ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता, व्यसनमुक्त भारत, सेवा सेतू अभियान, ‘बदलाची गोष्ट’ आणि ‘जनसेवक महाकुंभ’ असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

You cannot copy content of this page