सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव सर्कल येथे चारचाकी आणि दुचाकीत झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. तर दुसऱ्या युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्याला गोवा-बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे.
मळगाव येथे दुचाकी (एम. एच. ०५ जीएम ४०६१ ) व चारचाकी (एम.एच. ०७ एजी. ८१२३) यात आज सायंकाळी हा अपघात झाला. या अपघातात नामदेव आजगावकर (वय १८, रा.मळगाव ) या युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुर्वेश शेर्लेकर (वय १८, रा.मडुरा) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव सर्कल दरम्यान ही घटना घडली. आपल्या दुचाकीवरून मळगाव येथे जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी टाटा पंचची धडक बसून ते युवक रस्त्यावर फेकले गेले. यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातग्रस्तांना सावंतवाडीचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर, श्याम हळदणकर, स्थानिक ग्रामस्थ संजय जोशी, सिद्धेश आजगावकर, पांडुरंग हळदणकर, शंकर केरकर, अजय राऊळ,शंकर खडपकर, हनुमंत पेडणेकर आदींनी मदतकार्य करत रूग्णवाहीकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान एका युवकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी जाहीर केले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे, पोलिस हवालदार धोत्रे, अनिल धुरी, कोरगांवकर, पोलीस पाटील साईश केरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
