पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन; माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी खासदार नारायण राणे ,पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन विविध विषयांवर वेधले लक्ष..
⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या पात्र वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने शासकीय सेवेत तातडीने सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली.
यावेळी सफाई कामगारांच्या वारसांच्या प्रलंबित नियुक्तीबाबत सविस्तर निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या प्रकरणात गृह विभागाशी विशेष लक्ष घालून संबंधित तिन्ही वारसांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
लाड समितीच्या शिफारशी, मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २४ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या पात्र वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय झालेला आहे. मात्र, वर्षाहून अधिक काळ लोटूनही सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून खुल्या प्रवर्गातील पात्र वारसांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नसल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
या प्रलंबित प्रकरणात बांदा येथील सौ. अंजली अभिनय बांदेकर, सावंतवाडी येथील श्री. काशिनाथ रमेश नाईक आणि कुडाळ येथील सौ. भाग्यश्री रामचंद्र काळप या तीन वारसांचा समावेश आहे. त्यांच्या प्रलंबित नियुक्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची मागणी प्रवीणभाई भोसले यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली.दरम्यान, शिष्टमंडळाने खासदार नारायण राणे यांची मुंबई येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
