Headlines

देशभरातील ११७ एनसीसी अधिकाऱ्यांमध्ये देवगडच्या प्रा. सुनेत्रा ढेरे प्रथम…

‘कमांडंट गोल्ड मेडल’ने सन्मान; लवकरच कॅप्टन रँक प्रदान होणार..

⚡देवगड ता.२३-: देवगड महाविद्यालयाच्या फिजिक्स विभागातील प्राध्यापिका व ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या अधिकारी लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांनी ग्वाल्हेर येथील एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झालेल्या रिफ्रेशर कोर्समध्ये देशभरातील ११७ एनसीसी अधिकाऱ्यांमध्ये गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘कमांडंट गोल्ड मेडल’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे देवगड महाविद्यालयासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा खडतर रिफ्रेशर कोर्स आयोजित करण्यात आला होता. देशभरातून ११७ एनसीसी अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. आपत्ती व्यवस्थापन, मॅप रीडिंग, रायफल ड्रिल यांसह विविध विषयांचे प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिकांचा या कोर्समध्ये समावेश होता.
लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांनी केवळ एकूण गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळविले नाही, तर रायफल शूटिंग, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली.
एनसीसी अधिकारी होण्यासाठी त्यांनी २०२० मध्ये ग्वाल्हेर येथे तीन महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून पूर्व कमिशन प्रमाणपत्र प्राप्त केले होते. त्यानंतर त्यांना आर्मीमधील लेफ्टनंट रँक मिळाली. या रिफ्रेशर कोर्समधील उल्लेखनीय कामगिरीनंतर त्यांना नजीकच्या काळात कॅप्टन रँक प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांचे हे दैदिप्यमान यश प्रामाणिक परिश्रम, शिस्त, समर्पण आणि गुणवत्तेची साक्ष देणारे आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ५८ महाराष्ट्र एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज, ॲडम ऑफिसर लेफ्ट. कर्नल तनुज मंडलिक, संस्था पदाधिकारी, देवगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page