भाभा अणुसंशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांची बांद्याला भेट
बांदा/सकाळ वृत्तसेवा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील बदलांची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये मोफत मार्गदर्शन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची तयारी असल्याचे भाभा अणुसंशोधन केंद्राचे (BARC) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांनी सांगितले.
डॉ. टकले यांनी काल (ता. २२) बांद्याला भेट दिली. यावेळी रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने त्यांचे माजी अध्यक्ष रोहन कुबडे, सचिव संकेत वेंगुर्लेकर, मयूर मसुरकर, पत्रकार नीलेश मोरजकर व कर सल्लागार समीर परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वैशाली पाटील उपस्थित होत्या.
डॉ. टकले हे भाभा अणुसंशोधन केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून विज्ञानाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये विज्ञान, अंतराळ, तंत्रज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. २०१७ मध्ये त्यांच्या पुढाकारातून पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी अभ्यास केंद्र सुरू केले आहे. येथे निवास, भोजन, ग्रंथालय व मार्गदर्शनपर व्याख्यानांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
“आजच्या काळात एआय तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत आहे. ग्रामीण भागातील मुलांनाही या तंत्रज्ञानाची ओळख आणि त्याचा योग्य वापर समजणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यात शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना एआय व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मोफत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही निश्चितच उत्सुक आहोत,” असे डॉ. टकले यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा, अखंड भारताची विविधता तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समाजाच्या विकासातील सहभाग याबाबतही विचार मांडले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि नव्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी केले.
चौकट
विद्यार्थ्यांसाठी विज्ञानप्रसाराची धडपड
डॉ. संतोष टकले यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला आहे. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान दिन, शिक्षक मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी विज्ञानविषयक जनजागृती केली आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मार्गदर्शन वर्ग घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
