Headlines

वन्यजीव सप्ताहानिमित्त बांद्यात विशेष बर्ड वॉक

बांदा/सकाळ वृत्तसेवा
वन्यजीव सप्ताहानिमित्त सह्याद्री ग्रीन फोर्स, बांदा यांच्या वतीने रविवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी विशेष बर्ड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत कॅनल रोड, बळवंतनगर, बांदा परिसरात ही पक्षीनिरीक्षण फेरी होणार आहे.
परिसरातील स्थानिक पक्ष्यांची नोंद करणे, विविध पक्ष्यांची ओळख करून घेणे, त्यांच्या अधिवासाबाबत माहितीची देवाणघेवाण करणे तसेच निसर्ग व जैवविविधतेबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये निसर्ग व पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी आणि पक्षीनिरीक्षक व निसर्गप्रेमींना एकत्र येण्याची संधी मिळावी, यासाठी या बर्ड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सहभागी होता येणार असून प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. सहभागी नागरिकांनी सकाळी ७ वाजता वेळेत उपस्थित राहावे. पिण्याचे पाणी, आरामदायी शूज व निसर्गाशी मिळते-जुळते आरामदायी कपडे परिधान करावेत. दुर्बीण अथवा कॅमेरा असल्यास तो सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पक्षीनिरीक्षणादरम्यान पक्ष्यांना त्रास होईल असा मोठा आवाज करू नये, परिसरात प्लास्टिक अथवा कचरा टाकू नये तसेच वनस्पती, फुले किंवा निसर्गातील कोणत्याही घटकाचे नुकसान करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुलांनी पालकांसोबत सहभागी व्हावे, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी प्रवीण सातोस्कर, बांदा – (मो. ९४२३५९८९८६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सह्याद्री ग्रीन फोर्स, बांदा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page