Headlines

‘शाळा वाचवा…’साठी ५ ऑक्टोबरपासून मुंबईत बेमुदत आंदोलन

कुडाळ तालुक्यातून ७००, तर सिंधुदुर्गातून ३ हजार नागरिक सहभागी होणार

कुडाळ : सरकारी व अनुदानित शाळांबाबत शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ तसेच शिक्षणाच्या हक्काच्या रक्षणासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’च्या वतीने ५ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कुडाळ तालुक्यातून किमान ७०० नागरिक सहभागी होतील, अशी माहिती सेवानिवृत्त शिक्षक संजय वेतुरेकर यांनी दिली.
या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी मंगळवारी कुडाळ मराठा समाज हॉल येथे विविध सामाजिक संघटना, शिक्षणप्रेमी, संस्थाचालक, सरपंच, शिक्षक आणि पालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर संजय वेतुरेकर आणि अंकुश कदम यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची पार्श्वभूमी व प्रमुख मागण्या स्पष्ट केल्या. यावेळी प्रशांत आडेलकर, युगांत चव्हाण, आर्या होळकर, स्नेहा शिरसाट, ज्ञानेश्वर सावंत आणि आनंद राठये उपस्थित होते.
संजय वेतुरेकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाचे विकेंद्रीकरण होत ते गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले. अनेक पिढ्या घडविणाऱ्या आणि ग्रामीण भागाच्या शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शाळांवर आज बंद होण्याची वेळ आली असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारी व अनुदानित शाळांची संख्या कमी होत असताना स्वयंअर्थसहाय्यित आणि खासगी शाळांना प्रोत्साहन मिळत असल्याने त्याचा परिणाम ग्रामीण, वंचित, दलित आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांवर होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
‘शाळा ही केवळ इमारत नसून गावाचे भूषण आणि गावाचा आत्मा आहे,’ असे सांगत हे आंदोलन शिक्षक किंवा नोकरवर्गाच्या हितासाठी नसून विद्यार्थी, पालक आणि समाजाच्या प्रश्नांसाठी असल्याचे वेतुरेकर यांनी स्पष्ट केले. ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनात कुडाळ तालुक्यातून किमान ७००, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २,५०० ते ३,००० नागरिक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंकुश कदम म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात येत आहेत. शाळांबाबतच्या शासनाच्या धोरणांविषयी नागरिकांमध्ये अस्वस्थता असल्याचे त्यांनी सांगितले. ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून १० हजारांहून अधिक नागरिक आंदोलनात सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला.
शिक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन कदम यांनी केले. तसेच ग्रामस्थांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नातून उभ्या केलेल्या शाळांचे जतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आंदोलनाची जनजागृती अधिक व्यापक करण्यासाठी बुधवारपासून कुडाळ तालुक्यातील विविध गावांमध्ये लहान बैठका घेण्यात येणार असल्याची माहितीही अंकुश कदम यांनी दिली.

You cannot copy content of this page