⚡मालवण,ता.२२-:
शिवसेनेचे मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजेंद्र उर्फ राजा गावकर यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी याबाबतचे अधिकृत पत्र कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. तसेच, या राजीनाम्याची प्रत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनाही सादर करण्यात आली आहे.
राजा गावकर यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, “काही वैयक्तिक कारणास्तव सध्या राजकारणासाठी आवश्यक तो वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे माझ्याकडे असलेल्या सिंधुदुर्ग मच्छीमार सेल जिल्हाप्रमुख तसेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ता या दोन्ही पदांचा मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे”.
या पदांना योग्य न्याय मिळावा आणि या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्यासाठी इतर योग्य व्यक्तीस संधी मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच, पक्षाने आपल्या राजीनाम्याचा स्वीकार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
