⚡मालवण ता.१८-:
हिवाळे धुरीवाडी येथील देवकोंड परिसरात नदीत आंघोळीसाठी गेलेल्या यश अनंत धुरी (१८, रा. नालासोपारा, सध्या हिवाळे धुरीवाडी) या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. गणेशोत्सवासाठी गुरुवारी वडिलांसोबत तो गावी आला होता.
शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता तो एका मित्रासोबत नदीत उतरला होता. पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे गेल्यानंतर तो भोवऱ्यात सापडून बुडाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर यशचा मृतदेह नदीतील गाळात आढळून आला.
हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी शोधकार्यात सहभाग घेतला. आचरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. एपीआय संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मालवण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बुडून मृत्यूची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हिवाळेत नदीत बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू…
