११ ते १३ सप्टेंबरदरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर एकेरी वाहतूक; चार ठिकाणी बॅरिकेडिंग
बांदा/प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन बांदा पोलिस ठाण्याच्या वतीने ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत राहावी, वाहनांची कोंडी होऊ नये आणि नागरिकांना सुरक्षितपणे गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रमुख मार्गांवर एकेरी वाहतूक तसेच काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
बांदेश्वर मंदिर चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौक, मोर्येवाडा ते तेली तिठा मार्गे आळवाडा तिठा आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक हॉस्पिटल कट्टा या मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तलाठी कार्यालयासमोरील गांधी चौक रस्ता, जिल्हा परिषद शाळा, बोन्द्रे दुकानासमोरील रस्ता आणि गुरु मेस्त्री यांच्या घरासमोरील रस्त्याने बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
चार मार्गांवर वाहतुकीस बंदी
छत्रपती संभाजी महाराज चौक ते गांधी चौक या बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच घोडेमोडणी (बोन्द्रे दुकानासमोर) ते गांधी चौक बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्ता ते गांधी चौक आणि गुरु मेस्त्री यांच्या घरासमोरील रस्ता ते घोडेमोडणी या मार्गांवरही तीनचाकी व चारचाकी वाहनांना वाहतुकीस बंदी राहणार आहे.
कन्या शाळेच्या मार्गावरून वाहतूक बाहेर
कन्या शाळा, बांदा येथून बांदेश्वर मंदिराकडील रस्त्याने येणारी वाहने खेमराज हायस्कूलकडील रस्त्याने बाहेर जातील, अशी वाहतूक व्यवस्था पोलिसांनी केली आहे.
चार ठिकाणी पार्किंगची सुविधा
वाहनधारकांसाठी बांदेश्वर मंदिर परिसर, आळवाडा मैदान, मातृत्व मेडिकलजवळील मोकळी जागा तसेच खेमराज हायस्कूल पटांगण येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी बाजारपेठेत वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेत आपली वाहने निर्धारित पार्किंगच्या ठिकाणीच उभी करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एकेरी मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कोणतेही वाहन उभे करू नये. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी बांदा पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक नियोजनाच्या कालावधीत नागरिकांना काही अडचण अथवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास बांदा पोलिस ठाणे : ०२३६३-२७०२३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
