Headlines

शैक्षणिक योगदानाबद्दल शिक्षक अनिल वरक यांचा विशेष सन्मान…

⚡बांदा ता.११-: पाडलोस येथील शाळेचे शिक्षक अनिल वरक यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जनजागृती सेवा संस्था, ठाणे यांच्या वतीने त्यांच्यासह शाळेतील शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, पाडलोसच्या सरपंच सलोनी पेडणेकर, रश्मी मुसळे साळगावकर, दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार नीलेश मोरजकर, युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान, पत्रकार यश माधव, विश्वनाथ नाईक, केंद्र समन्वयक अमित टक्केकर, संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर गावडे, श्रीकृष्ण आंबेकर, अमोल माधव, सानिका पाडलोकर, सरस्वती गावडे, प्रशांत माधव, आकाश गावडे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना रश्मी मुसळे साळगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या बदलत्या जीवनशैलीबाबत चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मुलांनी भरपूर खेळले पाहिजे; मात्र मोबाईलवर खेळण्यापेक्षा मित्र-मैत्रिणींसोबत मैदानी खेळ खेळण्याला प्राधान्य द्यावे. मैदानी खेळांमुळे मुलांचा शारीरिक तसेच मानसिक विकास होतो. त्याचबरोबर मुलांनी गोष्टींची भरपूर पुस्तके वाचावीत. वाचनामुळे कल्पनाशक्ती, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते.”
संस्थाध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना अभ्यास शिकवणारा नसून त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. ग्रामीण भागातील शिक्षक प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. अशा शिक्षकांच्या कार्याची समाजाने दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे. अनिल वरक यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान निश्चितच कौतुकास्पद असून त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे यश माधव यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच वाचन, क्रीडा, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचा मैदानी खेळ आणि वाचनाकडे कल कमी होत असताना पालक व शिक्षकांनी मुलांना या दोन्ही गोष्टींसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
मुख्याध्यापक विजय गावडे व शिक्षक अनिल वरक यांच्या उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळ्याने शाळेच्या शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन मिळाले. शिक्षकांच्या सन्मानाबद्दल उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

You cannot copy content of this page