Headlines

गणेश चतुर्थीच्या तोंडावर बँक कर्मचाऱ्यांचा संप…

जिल्ह्यातील बँकिंग व्यवहार विस्कळीत:सलग चार दिवस बँकांना सुट्टी,ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठी गैरसोय..

⚡कणकवली ता.११- : गणेश चतुर्थीच्या तोंडावर राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकांचे नियमित कामकाज ठप्प झाले असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

गावखेड्यातील नागरिक विविध बँकिंग कामांसाठी बँकांमध्ये येत आहेत. मात्र कर्मचारी संपावर असल्याने प्रत्यक्ष कामकाज होत नसल्यामुळे ग्राहकांना बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना शुक्रवारी संप, त्यानंतर शनिवारची दुसरी शनिवारची सुट्टी, रविवारची साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारची गणेश चतुर्थीची सुट्टी अशा सलग चार दिवस बँकिंग व्यवहारांवर परिणाम होणार आहे.

यामुळे पैसे काढणे, पैसे जमा करणे, धनादेशाशी संबंधित कामे तसेच इतर आवश्यक बँकिंग व्यवहारांसाठी नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात घरगुती खर्चासाठी तसेच गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पैशांची गरज असलेल्या ग्राहकांची गैरसोय होत आहे.

राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी जिल्हाभरातील संपात सहभागी झाल्याने त्याचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरही जाणवत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये आर्थिक व्यवहार वाढण्याची शक्यता असताना बँकिंग सेवा विस्कळीत झाल्याने व्यापारी, शेतकरी, नोकरदार तसेच सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.

दरम्यान, पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, तसेच Performance Linked Incentive (PLI) योजनेमध्ये बँक व्यवस्थापन आणि कर्मचारी-अधिकारी यांच्यात असलेली मोठी तफावत दूर करावी, यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आल्याचे कर्मचारी संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

एकीकडे आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे गणेश चतुर्थीच्या तोंडावर बँकिंग सेवा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य ग्राहक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत. सणाच्या काळात आर्थिक व्यवहार सुरळीत राहणे आवश्यक असताना बँक बंद असल्याने ग्राहकांना आता उपलब्ध असलेल्या डिजिटल बँकिंग सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे.

You cannot copy content of this page