Headlines

शासकीय लॅपटॉप परत करून कृषी अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध…

वैभववाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र कृषी सेवा महासंघाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पुढील टप्प्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वैभववाडी येथील मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शासनाकडून देण्यात आलेले शासकीय लॅपटॉप कार्यालयास परत करून तीव्र निषेध नोंदविला. तांत्रिक संवर्गासाठी शेतकरी केंद्रित आकृतीबंध तयार करावा, तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या तांत्रिक अधिकाऱ्यांची पदे कमी न करता आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र कृषी सेवा महासंघाच्या वतीने ३ ते ६ सप्टेंबरदरम्यान लेखणी बंद व सामूहिक रजा, ७ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन आणि ९ सप्टेंबर रोजी शासनाच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर बहिष्कार अशा विविध टप्प्यांत आंदोलन करण्यात आले. शासनासोबत बैठका होऊनही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने ११ सप्टेंबर रोजी शासकीय लॅपटॉप कार्यालयास परत करण्याची भूमिका घेण्यात आली.
सध्याचा आकृतीबंध रद्द करून सर्वसमावेशक तज्ज्ञ समिती स्थापन करावी व तिच्या शिफारशीनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा, अशी प्रमुख मागणी महासंघाने केली आहे. शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून शासनाने तांत्रिक संवर्गाच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा वैभववाडी तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page