रमण वायंगणकर:कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाची कार्यकारिणी सभा,समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा..
⚡कुडाळ ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाचे जिल्हा भंडारी भवन उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे, असे गौरवोद्गार भंडारी समाजाचे नेते रमण वायंगणकर यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाची जिल्हा कार्यकारिणी सभा कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना रमण वायंगणकर बोलत होते.
श्री. वायंगणकर म्हणाले की, माजी आमदार कै. बाळी किनळेकर आणि काकासाहेब चव्हाणकर यांच्या नेतृत्वाखाली भंडारी समाजाला संघटित करण्याचे काम झाले. त्यानंतर समाजाच्या माध्यमातून विविध मेळावे, शैक्षणिक उपक्रम तसेच युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. मात्र, जिल्हा भंडारी भवनाचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले. आगामी काळात भंडारी समाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने वाटचाल करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सभेच्या प्रारंभी कणकवली येथील भंडारी समाजातील दिवंगत मनोहर पालयेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विविध तालुका भंडारी समाजांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यांबाबत माहिती घेऊन संबंधित तालुका पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेला जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, उपाध्यक्ष सुनील नाईक, जिल्हा सचिव भरत आवळे, विकास वैद्य, आचरा येथील चंदन पांगे, मालवणचे श्रीकांत वेंगुर्लेकर, आचऱ्याचे प्रवीण आचरेकर व विजय पांगे, सावंतवाडीचे नंदकिशोर कोंडये, कुडाळचे दर्शन कुडव व शरद पावसकर, मातोंडचे विकास वैद्य, मनोहर साटेलकर यांच्यासह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
