‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’साठी सिंधुदुर्गचे उद्दिष्ट; गतवर्षी सात युवक राज्यस्तरावर, सम्राट पाटील
⚡ओरोस, ता. ९ :-: देशाच्या विकासाचा विचार मांडण्याबरोबरच नेतृत्व, नवोपक्रम, उद्योजकता आणि विविध कौशल्ये राष्ट्रीय व्यासपीठावर सिद्ध करण्याची संधी सिंधुदुर्गातील युवकांना ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२७’च्या माध्यमातून मिळणार आहे. या उपक्रमात यंदा जिल्ह्यातील किमान सहा हजार युवकांचा सहभाग नोंदविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्यातील सात युवकांनी राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. यंदा त्यापेक्षाही अधिक युवकांनी पुढील टप्पे गाठावेत, यासाठी ‘मेरा युवा भारत’कडून व्यापक प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी दिली.
येथील माय भारत कार्यालयात बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री पाटील बोलत होते. केंद्र सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘मेरा युवा भारत’च्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२७’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या प्रक्रियेत तरुणांचा थेट सहभाग वाढविणे, त्यांच्या कल्पना, नेतृत्वगुण आणि नवोपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे.
या उपक्रमासाठी १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘MY Bharat.gov.in’ पोर्टलवर सहभाग नोंदविता येणार आहे. १५ ते २९ वयोगटातील भारतीय युवकांसाठी ही संधी खुली आहे. प्रारंभी ‘विकसित भारत प्रश्नमंजुषा’ होणार असून, त्यातून पात्र ठरणाऱ्या युवकांना पुढील टप्प्यात प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर निबंध स्पर्धा, जिल्हा व राज्यस्तरीय निवड प्रक्रिया आणि अंतिम राष्ट्रीय फेरी असा या उपक्रमाचा प्रवास असेल.
जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवकांना राज्यस्तरापर्यंत जाण्याची, तर पुढे निवड झालेल्या युवकांना १० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय विकसित भारत युवा नेतृत्व संवादात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. अंतिम टप्प्यात देशभरातील निवडक युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपल्या संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.
युवकांच्या विविध गुणांना संधी देण्यासाठी यंदा सहा प्रमुख प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात विकसित भारत चॅलेंज, सांस्कृतिक उपक्रम, ‘डिझाईन फॉर भारत’, ‘हॅक फॉर सोशल कॉज’, युवा उद्योजक चॅलेंज आणि युवा संसद यांचा समावेश आहे. लोकनृत्य, लोकसंगीत, चित्रकला, वक्तृत्व, कथाकथनापासून स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय, स्टार्टअप संकल्पना आणि देशाच्या विकासाशी संबंधित विषयांवरील विचार मांडण्यापर्यंत विविध संधी उपलब्ध आहेत.
