प्रवाशांच्या गैरसोयीबाबत बैठकीत जाब:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत..
⚡कुडाळ ता.०९-: कुडाळ आगारातून ग्रामीण व प्रवासी हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बंद ठेवण्यात आलेल्या ६७ एसटी बसफेऱ्या अखेर पूर्ववत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कुडाळ आगारातील या बसफेऱ्या बंद असल्याने अनेक गावांमधील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेण्यात आली.
या बैठकीला विद्यमान सभापती मिलिंद नाईक, आमदार निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश घाडी, राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या कुडाळ आगार अध्यक्षा रश्मी नाईक तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे विभागीय सरचिटणीस रोशन तेंडुलकर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान बंद असलेल्या ६७ बसफेऱ्यांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आगार व्यवस्थापकांकडे विचारणा करण्यात आली. विद्यार्थ्यांसह कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता या सर्व फेऱ्या तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
या मागणीची दखल घेत संबंधित ६७ बसफेऱ्या पूर्ववत करण्याबाबत आवश्यक आदेश देण्यात आले. त्यानुसार ९ सप्टेंबरपासून या सर्व बसफेऱ्या पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा विचार करता वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासही मदत होणार आहे.
प्रवाशांच्या प्रश्नांसाठी आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेना यापुढेही पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
