Headlines

धोकादायक स्थितीत कलंडलेल्या वीज खांबामुळे अपघाताची भीती…

वीज वितरणने तात्काळ कार्यवाही करावी :नगरसेविका दर्शना कासवकर..

⚡मालवण ता.०९-:
मालवण शहरातील धुरीवाडा येथील कासवकर बालोद्यान परिसराच्या बाजूला वीज खांब धोकादायक स्थितीत कलंडला असून, एका माडाच्या झाडाच्या आधारावर हा खांब उभा आहे. वीज वाहिन्या माडाच्या झाडाला टेकल्याने अपघाताची भीती निर्माण झाल्याने वीज वितरणने तात्काळ या धोकादायक वीज खांबाची दुरुस्ती करून तो योग्य स्थितीत करावा अथवा नव्याने उभारणी करावी, अशी मागणी मालवणच्या नगरसेविका दर्शना कासवकर यांनी केली आहे. तसेच परिसरातील वीज समस्यांकडेही तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

कासवकर बालोद्यान परिसरातील ट्रान्सफॉर्मरमधून तीन फेजपैकी सध्या एका फेजवरच वीज वाहिनी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत मालवण शहर विजवितरणच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेविका सौ कासवकर यांनी केला आहे

वीज वितरणच्या गलथान कारभाराचा फटका वीज ग्राहकांना बसत असून गणपती सणाच्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याची अथवा कमी दाबाने वीजपुरवठा होण्याची शक्यता आहे. याबाबत वीज वितरणने तातडीने कार्यवाही करावी, असेही दर्शना कासवकर यांनी सांगितले.

वीज वितरण विभागाने याबाबत तातडीने समस्या दूर न केल्यास पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे नगरसेविका दर्शना कासवकर यांनी सांगितले

You cannot copy content of this page