Headlines

पाताडे स्टॉपवर एस.टी. बस थांबवाविद्यार्थी व ग्रामस्थांचे कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन

कणकवली : वागदे गावठणवाडी (पाताडे स्टॉप) येथे एस.टी. बस थांबविण्यात यावी, तसेच वागदे व ओसरगाव येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसफेरी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी वागदे सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी बुधवारी कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले.

वागदे गावठणवाडी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी कणकवली, ओरोस, कसाल आदी ठिकाणी दररोज ये-जा करतात. मात्र, पाताडे स्टॉपवर एस.टी. बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्या-येण्यासाठी वेळेवर वाहतूक सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर कणकवलीहून सुटणारी एस.टी. बस वागदे पाताडे स्टॉपवर थांबविण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच वागदे व ओसरगाव येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सायंकाळी ५ वाजता एस.टी. बसची नवीन फेरी सुरू करावी, ओरोस-कसाल मार्गावरून येणारी सकाळची एस.टी. बस पाताडे स्टॉपवर थांबवावी आणि विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी वागदे सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page