⚡सावंतवाडी ता.०९-:
मुंबई–सावंतवाडी मार्गावर नव्याने सुरू झालेल्या नियमित रेल्वेसेवेचे सावंतवाडी रोड स्थानकावर उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. गाडी स्थानकात दाखल होताच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने इंजिनचे पूजन, पुष्पहार अर्पण करून लोको पायलटांचा सत्कार करण्यात आला. प्रवाशांना पेढे वाटून या नव्या रेल्वेसेवेचा आनंद साजरा करण्यात आला.
गाडी क्रमांक १५०८७ काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सावंतवाडीकडे रवाना झाली होती. आज दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास गाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात दाखल झाली. निर्धारित वेळेपूर्वी गाडी पोहोचल्याने रेल्वेप्रेमी आणि प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
या गाडीला कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आल्याने मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः ऐन गणेशोत्सवाच्या काळात नियमित रेल्वेसेवा सुरू झाल्याने मुंबईतील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी लोको पायलट शैलेश पालकर व असिस्टंट लोको पायलट प्रवीण पारावे यांचा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तुतारी एक्सप्रेसनंतर सावंतवाडी रोड स्थानकातून आणखी एका नियमित रेल्वेसेवेची भर पडल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या गाडीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रवाशांनी आभार मानले.
स्वागत सोहळ्यास कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मिहिर मठकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट, अभिमन्यू लोंढे, नितिन गावडे, तेजस पोयेकर, प्रेरणा पोकळे, यूट्यूबर चिन्मय कोळे, उदय नाईक यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक व रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
