Headlines

नितीन राऊळ यांना राज्यस्तरीय ‘आदर्श समाजरत्न’ पुरस्कार…

सामाजिक, शैक्षणिक व ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनकडून दखल..

⚡बांदा ता.०९-: इन्सुली गावासह सावंतवाडी तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, ग्रामविकास तसेच विविध लोकहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श समाजरत्न सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ सोहळा’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात राऊळ यांचा सन्मान करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत हा सोहळा होणार आहे.
नितीन राऊळ यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना ग्रामीण भागातील विविध प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. रस्ते व पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, युवक व क्रीडा या क्षेत्रांत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेतला आहे.
राऊळ यांच्याकडे जिल्हा शिक्षण समिती सदस्य म्हणूनही जबाबदारी असून, शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. तसेच इन्सुली मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. यापूर्वी त्यांनी इन्सुली शाळा क्रमांक ६ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
‘जनतेचा प्रश्न म्हणजे आपला प्रश्न आणि विकासकाम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे हीच आपली जबाबदारी,’ या भूमिकेतून राऊळ कार्यरत असल्याचे पुरस्काराच्या निमित्ताने नमूद करण्यात आले आहे. पद मिळाल्यानंतर केवळ जनतेपासून दूर न जाता जनतेमध्ये राहून त्यांच्या प्रश्नांची जाण ठेवणे आणि प्रशासनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
सामाजिक, शैक्षणिक, ग्रामविकास आणि लोकसेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनकडून ‘आदर्श समाजरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याने इन्सुली परिसरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो:-
नितीन राऊळ.

You cannot copy content of this page