प्रभाकर सावंत यांची माहिती: पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात काम करण्याची दिली संधी..
⚡सिंधुदुर्ग दि.०९-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरून पक्षीय निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या काही पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर विजयसिंह सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.
निलंबित करण्यात आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी आपली चूक लक्षात येताच पक्षाकडे निलंबन रद्द करण्यासाठी विनंती अर्ज केला होता. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार संबंधित पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. तसेच त्यांना पुन्हा एकदा पक्षकार्यासाठी संधी देण्यात आली आहे.
निलंबन रद्द करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नितीन एकनाथ राऊळ, इग्नो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा, सुजाता अजित पेडणेकर, जितेंद्र पांडुरंग गावकर, शर्वाणी शेखर गावकर, स्वप्ना सुरेंद्र नाटेकर, योगेश अशोक केणी, उल्हास उत्तम परब, स्नेहल संदीप नेमळेकर, साक्षी संदीप नाईक, सुप्रिया शैलेश नाईक, प्रविण नारायण गवस आणि अनिलदेव फाटक यांचा समावेश आहे.
पक्षाच्या शिस्तीचे पालन करून आगामी काळात पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याची अपेक्षा या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या या निर्णयामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळाली आहे.
