Headlines

अनधिकृत बॅनरवर कणकवली नगरपंचायतीची कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्युत खांब, फुटपाथ व दर्शनी ठिकाणांवरील बॅनर हटविण्यास सुरुवात

कणकवली : शहरातील फुटपाथ, विद्युत खांब तसेच विविध दर्शनी ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेले जाहिरातींचे बॅनर हटविण्यास कणकवली नगरपंचायतीने सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशभक्तांचे स्वागत करणारे विविध बॅनर मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते.

विद्युत खांबांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.

अनधिकृत जाहिरात फलक व बॅनरबाबत तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बॅनरवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आता शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर हटविण्याची मोहीम नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची व गणेशभक्तांची वर्दळ वाढणार असल्याने सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांवरील अनधिकृत बॅनर हटविण्याच्या नगरपंचायतीच्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.

You cannot copy content of this page