Headlines

सावंतवाडीत ९ सप्टेंबरला भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी…

प्रभाकर सावंत यांची माहिती: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणेंसह दिग्गज नेते राहणार उपस्थित..

⚡सावंतवाडी, ता. ५-: भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक येत्या ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार योगेश सागर, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अतुल काळसेकर आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार नारायण राणे हे देखील प्रथमच जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या कार्यकारिणी बैठकीला उपस्थित राहणार असल्याने या दोन्ही नेत्यांसह उपस्थित मान्यवरांचे भाजपच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
या बैठकीत जिल्ह्यात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात येणार असून, उल्लेखनीय विकासकामांबद्दल संबंधितांचे विशेष अभिनंदन करण्यात येणार आहे. तसेच आगामी काळातील पक्ष संघटनात्मक कार्यक्रमांबाबतही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही प्रभाकर सावंत यांनी दिली.
या विस्तारित कार्यकारिणी बैठकीला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page