सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; दहा दिवसांत भेट घेणार
बांदा/प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील विलवडे गावातील क्वारींमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून, येथील सर्व क्वारी बुजवून उत्खननामुळे झालेली पर्यावरणाची हानी भरून काढावी, अशी मागणी वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी केली आहे. यासंदर्भात येत्या दहा दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलवडे गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने क्वारींना उत्खननाच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणावर पारंपरिक वृक्षसंपदा तसेच देवरायांची तोड करण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील जैवविविधतेला मोठा फटका बसला आहे.
क्वारी मालकांकडून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर अमर्यादित उत्खनन करण्यात आल्याचा आरोपही गवस यांनी केला आहे. उत्खननामुळे क्वारीच्या ठिकाणी ठिकठिकाणी मोठमोठे व खोल खड्डे निर्माण झाले असून, काही ठिकाणी लांबच लांब पाण्याचे तलाव तयार झाले आहेत.
या खोल खड्ड्यांमुळे वन्यजीव, पाळीव जनावरे तसेच क्वारीलगतच्या जमीनमालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी ये-जा करताना अपघात होण्याचा धोका असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गवस यांनी म्हटले आहे.
विलवडे गावातील सर्व क्वारींची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून त्या बुजवाव्यात. तसेच क्वारींसाठी झालेल्या हजारो झाडांच्या तोडीमुळे आणि उत्खननामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीची भरपाई संबंधितांकडून करून घेऊन परिसराचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे गुणेश गवस यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पर्यावरणाची आणखी हानी होण्यापूर्वी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
फोटो:-
गुणेश गवस.
