वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील मठ कणकेवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत गोपाळ उर्फ के.जी. गावडे ( वय 62) यांचे शनिवारी 5 सप्टेंबर रोजी गोवा बांबूळी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यासह जिल्हाभरातून हळहळ व्यक्त होत आहे. दैनिक गोमंतक तसेच त्यानंतर दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रातून त्यांनी आपल्या लेखणीद्वारे उत्कृष्ट काम केले होते. आपल्या पत्रकारितेद्वारे सामाजिक, राजकीय याबाबतीत लिखाण करताना परखड भूमिका मांडताना सडेतोड पत्रकार म्हणून काम केले होते. वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध समाजाभिमुख उपक्रम राबवून आपली छाप सोडली होती. मठ टाकयेवाडी येथील श्री संत लालाजी मंडळाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी विविध उपक्रमाद्वारे चांगले कार्य केले होते. त्यांच्या निधनाने एक मनमिळाऊ, मार्गदर्शक पत्रकार हरपला अशी भावना पत्रकार बांधवातून, समाजातून व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मठ ग्रामपंचायत सदस्य व मठ शिवाजी चौक येथील व्यावसायिक कविता गावडे यांचे ते पती होत. तर रिक्षाचालक सिताराम गावडे यांचे ते बंधू होत.
वेंगुर्ला मठ येथील ज्येष्ठ पत्रकार के.जी. गावडे यांचे निधन
