Headlines

तांबोळीत विजेचा लपंडाव; ग्रामस्थ संतप्त

गणेशोत्सवापूर्वी वीजपुरवठा सुरळीत न केल्यास बांदा महावितरण कार्यालयावर धडक देण्याचा इशारा

बांदा/प्रतिनिधी
तांबोळी गावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असून, वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. काल गोकुळाष्टमीच्या दिवशीही दिवसभर वीज गायब राहिल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. विशेषतः उपवासाचा स्वयंपाक करताना गृहिणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना वीजपुरवठ्याची ही परिस्थिती कायम राहिल्यास सणासुदीच्या काळात ग्रामस्थांचे आणखी हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणने तांबोळी तसेच परिसरातील वीजपुरवठ्याची तातडीने पाहणी करून वारंवार होणारे खंडित वीजप्रवाहाचे कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य मिलिंद देसाई, तसेच रविराज सावंत, दीपेश सावंत आणि विवेक सावंत यांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवापूर्वी तांबोळी व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन बांदा येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
सणासुदीच्या काळात नागरिकांना वीजपुरवठ्यासाठी वारंवार महावितरणकडे धाव घ्यावी लागत असेल तर ही गंभीर बाब आहे. तांबोळी गावातील वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

You cannot copy content of this page