Headlines

बांद्यात गोविंदांचा जल्लोष; सहा थर रचून मानाची दहीहंडी फोडली…

⚡बांदा ता.०५-: ‘गोविंदा रे गोपाळा…’, ‘यशोदेच्या तान्ह्या बाळा…’, ‘लाल लाल पागोटा, गुलाबी शेला…’ यासह विविध हिंदी-मराठी गाण्यांच्या तालावर ठेका धरत बांद्यात गोविंदा पथकांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले. बेधुंद वातावरणात आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात शहरात दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील सर्वप्रथम मानाची बांदेश्वर मित्रमंडळाची दहीहंडी सिहगर्जना कला-क्रीडा गोविंदा मंडळ, बांदा गडगेवाडी या गोविंदा पथकाने तब्बल सहा थर रचून फोडली. गोविंदांनी मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
दहीहंडी उत्सवासाठी शहरातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाची रिपरिप सुरू असतानाही गोविंदांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. ढोल-ताशे आणि गोविंदांच्या घोषणांनी बांदा शहरातील वातावरण भक्तिमय तसेच उत्साहपूर्ण झाले होते. रात्री उशिरापर्यंत शहरात दहीहंडी फोडण्याचा थरार सुरु होता.
फोटो:-
बांदा देऊळवाडी येथे सहा थर रचून दहीहंडी फोडताना सिहगर्जना गोविंदा पथक. (छायाचित्र : निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page