Headlines

गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

डीजे व्यावसायिकांनी वेळ व ध्वनिमर्यादा पाळावी; गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन

कणकवली : गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण असून, या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या सुमारे दीडपट गणेशभक्त दाखल होतात. त्यामुळे पोलीस, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य यांसह विविध यंत्रणांवर मोठा ताण येतो. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून, या नियोजनाला सर्वांनी सहकार्य करावे. डीजे व ध्वनी व्यावसायिकांनी वेळेचे तसेच ध्वनिमर्यादेचे बंधन पाळावे. गणेश मंडळांनीही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस ठाण्याच्या सभागृहात शुक्रवारी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पोलीस पाटील, व्यापारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी नयोमी साटम यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव उपस्थित होते.

बैठकीत उपस्थितांनी विविध समस्या व सूचना मांडल्या. व्यापारी संघटनेचे दीपक बेलवलकर तसेच फळे, भाजी व फुले विक्रेता संघटनेचे अनिल हळदिवे यांनी गणेशोत्सव काळात पार्किंगची योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली. कासार्डे येथे मोकाट गुरांमुळे अपघात होत असल्याची समस्या मांडण्यात आली. तसेच वारगाव येथील धाब्याजवळ मोठे कंटेनर थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.

सिंधुदुर्गची लोकसंख्या सुमारे आठ लाखांहून अधिक असून, गणेशोत्सवात बाहेरून सुमारे चार लाख गणेशभक्त जिल्ह्यात दाखल होतात. या वाढत्या गर्दीचा ताण विविध यंत्रणांवर येतो. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोणत्याही यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी पूर्वनियोजन करण्यात येत असल्याचे साटम यांनी सांगितले.

कणकवली नाका ते पोलीस ठाण्यापर्यंतचा मार्ग एकेरी करण्याबाबत नियोजन करावे. रस्त्यालगत वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. एखाद्या वाहनचालकाच्या बेशिस्तीमुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्यास संबंधित वाहन टो करून पोलीस ठाणे अथवा योग्य मोकळ्या जागेत ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या.

गणेश विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेता व्यावसायिकांनी आपली सीसीटीव्ही यंत्रणा तपासून ती सक्षम ठेवावी. डीजे व्यावसायिकांनी वेळेचे व ध्वनिमर्यादेचे बंधन पाळावे. नियमांचे उल्लंघन करून आक्षेपार्ह गाणी वाजविल्यास डीजेचे साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशाराही साटम यांनी दिला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी एक कर्मचारी समन्वयक म्हणून तैनात ठेवावा. रस्त्यांवरील खड्डे भरण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना कराव्यात. विसर्जन मार्गावर विजेच्या तारा खाली असतील तर त्या सुरळीत करण्यासाठी महावितरणला कळवावे. अग्निशमन यंत्रणेचा आढावाही घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

गणेश आगमन व विसर्जनावेळी फटाके लावताना गणेशभक्तांनी दक्षता घ्यावी. गावांमध्ये अनुचित प्रकार घडल्यास पोलीस पाटलांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही साटम यांनी केले.

बैठकीपूर्वी पोलीस पाटील व महिलांनी नयोमी साटम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पोलीस पाटलांनी पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांचे स्वागत केले. प्रास्ताविक बच्छाव यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page