Headlines

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांवर आरोग्य विभागाची नजर…

सिंधुदुर्गनगरी ता ४
गणेशोत्सव १४ सप्टेंबर पासून सुरू होत असून गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात साथरोगाचा फैलाव होवू नये यासाठी १० ते १३ सप्टेंबर तसेच १६ व १७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेक पोस्ट असलेल्या १८ ठिकाणी वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने कामानिमित्त जिल्ह्याबाहेर राहतात. मुंबई, पुणे,गोवा, आदी शहरांत राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नोकरी व व्यवसायांच्या निमित्ताने स्थायिक झालेले मूळ रहिवासी हे नागरिक गणेश चतुर्थी निमित्त जिल्ह्यात एस टी किंवा रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत असतात. मात्र, हे नागरिक ज्या शहरात कामानिमित्त राहत असतात. त्या ठिकाणी सुरु असलेला हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस जोखमीच्या भागातुन जिल्ह्यात गणपती सणासाठी घरी येतात . साथरोग त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात येवू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून १० ते १३ सप्टेंबर आणि १६ व १७ सप्टेंबर या कालावधीत ही पथके सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यन्त नियुक्त करण्यात आली आहेत.
कणकवली, सावंतवाडीरोड, वैभववाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग या रेल्वे स्थानकावर, तसेच मालवण, वेंगुर्ला, कणकवली, वैभववाड़ी ,देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग कुडाळ बस स्थानक आणि आंबोली, फोंडाघाट, खारेपाटण, करूळ चेकपोस्ट , जि प दवाखाना भुइबावडाअशा एकूण १८ ठिकाणी ही पथके कार्यरत राहणार आहेत. सकाळी ८ ते दुपारी २, आणि दुपारी २ ते रात्रो ८ अशा दोन सत्रात १० सप्टेंबर ते १३ सप्टेंबर आणि १६ व १७ सप्टेंबर रोजी आरोग्य पथके कार्यरत राहणार आहेत .
अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.

घरोघरी साथ सर्वेक्षण करणार

जिल्ह्यात गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्याबाहेरील नागरिक रेल्वे , एसटी यासह खाजगी बस, वाहने , घेऊन मोठ्या प्रमाणात येतात हे नागरिक आरोग्य पथकांच्या संपर्कात येत नाहीत .थेट आपल्या गावी जातात .अश्या नागरिकाकडून साथरोग पसरु नये , यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊंन साथ सर्वेक्षण करण्यात येणार आहे . तरी चाकरमानी व स्थानिक नागरिकांनी कोणत्याही तापाची लक्षणे दिसताच तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा व उपचार करून घ्यावेत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी केले आहे .

You cannot copy content of this page