Headlines

बांदा निमजगा अंगणवाडीत चिमुकल्यांची गोकुळाष्टमी उत्साहात

दहीहंडी फोडून बालगोपाळांचा आनंद; श्रीकृष्णाच्या वेशभूषेने वेधले लक्ष

बांदा/प्रतिनिधी
बांदा-निमजगा येथील अंगणवाडीत चिमुकल्या बालगोपाळांनी गोकुळाष्टमीचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. यानिमित्त अंगणवाडी परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी श्रीकृष्णाच्या बालरूपाची अनुभूती उपस्थितांना करून दिली.
गोकुळाष्टमीनिमित्त अंगणवाडीतील मुलांनी श्रीकृष्णाची आकर्षक वेशभूषा केली होती. काही चिमुकल्यांनी कृष्ण, तर काहींनी पारंपरिक वेशभूषा साकारत उत्सवात रंगत आणली. यावेळी मुलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. गाणी, खेळ आणि विविध उपक्रमांमधून गोकुळाष्टमीचा आनंद लुटण्यात आला.
उत्सवातील विशेष आकर्षण ठरले ते दहीहंडीचे. चिमुकल्या बालगोपाळांनी एकमेकांच्या मदतीने थर रचत दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. दहीहंडी फोडताना मुलांचा उत्साह पाहून उपस्थित पालकांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमामुळे अंगणवाडी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
अंगणवाडीच्या माध्यमातून विविध सण-उत्सवांची माहिती मुलांना देतानाच त्यामागील सांस्कृतिक परंपरांची ओळख करून देण्यात येते. त्याच उद्देशाने गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांनी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करताना मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, मदतनीस गीतांजली सावंत यांच्यासह पालक उपस्थित होते. पालकांनी चिमुकल्यांचा उत्साह वाढवित कार्यक्रमाचा आनंद घेतला.
फोटो:-
बांदा-निमजगा अंगणवाडीत दहीहंडी फोडताना बालगोपाळ. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

You cannot copy content of this page