मालवण तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी; प्रलंबित प्रश्नांवर कार्यवाहीच्या सूचना..
⚡मालवण ता. ४-: जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा महेशकुमार नारकर यांनी मालवण तालुक्याचा दौरा करून बालविकास प्रकल्प कार्यालय, मालवण तसेच मिर्यांबांद, कुंभारमाठ-जरीमरी येथील अंगणवाडी केंद्रांना भेटी देत पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान सभापती नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना देण्यात येणारा पूरक पोषण आहार, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता, बालकांची उपस्थिती, विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रम तसेच केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी केली. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी संवाद साधून केंद्रातील दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे सभापती नारकर यांनी कौतुक केले. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सेविका व मदतनीस करत असलेल्या कार्याची त्यांनी विशेष प्रशंसा केली.
यावेळी अंगणवाडी केंद्रांमधील आवश्यक सुविधा, भौतिक अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच इतर आवश्यक बाबींची माहिती सभापती नारकर यांनी घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी मिर्यांबांदच्या सरपंच निलिमा परुळेकर, पंचायत समिती सदस्य योजना कांबळी, मानसी भोगावकर, बालविकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील बालकांना अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून दर्जेदार पोषण व पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सभापती अनुराधा नारकर यांनी यावेळी सांगितले.
