शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे वनपाल संदिप हजारे यांचे आवाहन
वेंगुर्ला
वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गावर आडेली खुटवळवाडी मुख्य मार्गावरून आज गुरुवारी (3 सप्टेंबर ) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने कारचालकाची तारांबळ उडाली. संबंधित कारचालकाने तातडीने स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी याबाबत मठ वनरक्षक प्रवीण कमळकर यांना माहिती दिली. तातडीने वेंगुर्ला तालुका वनपाल संदिप हजारे, मठ वनरक्षक प्रवीण कमळकर, जलद बचाव पथकाचे दिवाकर बांम्बर्डेकर, वैभव आमडोस्कर यांनी कुडाळहून आडेली इथे येत आडेली खूटवळवाडी, सोनसुरकरवाडी कार्यक्षेत्रात रात्री उशिरा पाहणी केली. तसेच संबंधित एक किमी कार्यक्षेत्रात फेरफटका मारून नागरिकांना जागरूकतेचे व दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी स्थानिक शेतकरी अशोक गडेकर, सुभाष नाईक, दिपक गडेकर, दादा आईर, समीर गडेकर, उज्ज्वल गडेकर, विनोद कुडाळकर, गौरव गडेकर, चेतन गडेकर, सनी गडेकर, पत्रकार अजय गडेकर तसेच अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान आडेलीसह वजराट गावात पाळीव जनावरे असल्याने शेतकऱ्यातून भीती व्यक्त करण्यात आली आहे. याच ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्याने व मोठी लोकवस्ती असल्याने वेंगुर्ला वनविभाग व कुडाळ येथील पथक यांनी याबाबतीत तातडीने भेट दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपली तसेच आपल्या पाळीव जनावरांची विशेष दक्षता घेण्याचे वनपाल संदिप हजारे यांनी आवाहन केले आहे.
दरम्यान गावात बहुसंख्य ठिकाणी स्ट्रीटलाईट सुरू असताना आडेली खुटवळवाडी कार्यक्षेत्रात संबंधित विभागामार्फत वारंवार ‘अनियमितपणे’ स्ट्रीटलाईट सुरू असल्याने याबाबतीत वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. आडेली खुटवळवाडी ते वजराट कडे जाणाऱ्या अंतर्गत रस्ता दुतरफा वाढलेली झाडी, गवत शालेय विद्यार्थी , नोकरदार वर्ग व वाहनधारक यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे. शासनाने याकडे वेळीच लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान वनविभाग अधिकारी व पथक रात्री उशिरापर्यंत आडेली पंचक्रोशीत जनजागृती दृष्टीने कार्यरत होते.
