Headlines

गणेशोत्सवापूर्वी बांदा-दाणोली मार्ग खड्डेमुक्त करा

सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी; दुरुस्तीचे आश्वासन

बांदा :-

कोकणातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा-दाणोली मार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून हा रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता विनायक जोशी यांना देण्यात आले.

बांदा-दाणोली हा परिसरातील अनेक गावांना जोडणारा प्रमुख व वर्दळीचा मार्ग आहे. मात्र, रस्त्याच्या अर्धवट व नियोजनशून्य कामामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे वाहनचालक, पादचारी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी व भाविक कोकणात दाखल होतात. त्यामुळे उत्सवाच्या काळात या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरील खड्डे कायम राहिल्यास अपघाताची शक्यता असून, गणेशमूर्तींचे आगमन, विसर्जन मिरवणुका तसेच नागरिकांच्या प्रवासात मोठी गैरसोय होऊ शकते.

त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील सर्व खड्डे काँक्रीटीकरण अथवा पावसाळ्यात टिकणाऱ्या डांबरीकरणाच्या माध्यमातून बुजवावेत. तसेच दुरुस्ती केलेल्या भागावर रोलर फिरवून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनायक जोशी यांनी गणेशोत्सवापूर्वी बांदा-दाणोली मार्ग सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, हेमंत दाभोलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page