मंदिर महासंघ महाराष्ट्र व देवस्थानांकडून तहसीलदारांना निवेदन सादर
मालवण (प्रतिनिधी)
हिंदूंच्या सण आणि उत्सवांमध्ये आयोजित केले जाणारे ‘महाप्रसाद’ आणि ‘अन्नदान’ उपक्रमांवर अन्नसुरक्षेच्या नावाखाली एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप करत, याविरोधात ‘मंदिर महासंघ महाराष्ट्र’ आणि मालवण तालुक्यातील विविध प्रमुख देवस्थानांच्या प्रतिनिधींनी आज तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन सादर केले. कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मीयांसाठी समान रीतीने लागू करण्यात यावेत, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी मंदिर महासंघासह परिसरातील प्रमुख देवस्थान विश्वस्त व मानकऱ्यांनी एकत्र येत तहसीलदारांची भेट घेतली. यात प्रामुख्याने इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, कसबा आचरे, श्री देव विठोबा देवस्थान, देवबाग मालवण, श्री देवी भद्रकाली देवस्थान, रेवंडी, श्री देव रामेश्वर देवस्थान, कांदळगाव या देवस्थानांच्या वतीने स्वतंत्र निवेदने देण्यात आली.
निवेदन देताना परिसरातील मानकरी, लोकप्रतिनिधी आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री गिरोबा देवस्थान नांदरुखचे मानकरी व विद्यमान सरपंच रामचंद्र चव्हाण, गिरोबा देवस्थान साळेलचे मानकरी व माजी सरपंच कमलाकर गावडे, मानकरी राजाराम गावडे, मंदिर महासंघाचे दीनानाथ गावडे, इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवस्थानचे रूपेश साटम, श्री काळबादेवी मंदिर मालवणचे मानकरी संदीप धुरी, श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगावचे मानकरी श्रीराम परब, धर्मप्रेमी महेंद्र पाताडे, श्री देवी भद्रकाली देवस्थान रेवंडीचे मानकरी विजय कांबळी तसेच सनातन संस्थेचे अनिकेत फाटक यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदू धार्मिक कार्यक्रमांमधील महाप्रसादावरच लक्ष्य केंद्रित न करता, नियम व कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी निष्पक्ष आणि समान असावी, अशी भूमिका या प्रसंगी उपस्थित प्रतिनिधींनी मांडली.
