Headlines

तारकर्लीच्या निशाणकाठी समुद्रकिनारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

मालवण : (प्रतिनिधी)

तारकर्ली येथील निशाणकाठी समुद्रकिनारी बुधवारी दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्यात अडचण निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सत्यवान भगत यांनी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास समुद्रकिनारी मृतदेह आढळल्याची माहिती संबंधित व्यक्तीला फोनद्वारे दिली. त्यानंतर दुपारी सुमारे २.१५ वाजता घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता समुद्रकिनारी एक पुरुष जातीचा मृतदेह उताण्या अवस्थेत आढळून आला.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ५० वर्षे असून अंगात हिरवटसर रंगाचा फुल हाताचा टी-शर्ट आहे. या टी-शर्टवर ‘साई संस्कृती फाउंडेशन, दहिसर पूर्व, मुंबई’ असे छापलेले आहे. कमरेला लाल-काळ्या रंगाचा दोरा, अंगावर काळ्या रंगाची हाफ पॅन्ट असून दोन्ही पायात काळ्या रंगाचे धागे बांधलेले आहेत. तसेच उजव्या हातात राखी बांधलेली आहे. समुद्राच्या पाण्यात राहिल्यामुळे मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून चेहरा ओळखता येत नाही. त्यामुळे सदर मृतदेह नेमका कोणाचा आहे, तो समुद्रात कसा आला आणि त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून अनोळखी मृतदेहाच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तसेच मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास केला जाणार आहे. याबाबतची माहिती पोलीसात पोलीस पाटील रंजन कोळंबकर यांनी दिली. अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत.

You cannot copy content of this page