स्वरूप वाळके:वैभव नाईक यांच्या रस्त्यांवरील आंदोलनावर युवासेनेचा पलटवार..
⚡कुडाळ :ता.२९-: मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रश्नावरून माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या टीकेला युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “२२ महिन्यांचा हिशोब मागण्यापूर्वी वैभव नाईक यांनी आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळाचा हिशोब जनतेसमोर मांडावा,” असे आव्हान त्यांनी दिले.
वाळके म्हणाले की, केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये उभे राहून फोटो काढल्याने विकासकामे होत नाहीत. त्यासाठी शासनदरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्याची धमक आवश्यक असते. आज विरोधकांकडे विकासकामांवर टीका करण्याशिवाय दुसरा मुद्दा उरलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
सलग दहा वर्षे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील सर्व रस्ते सुस्थितीत होते का, असा सवाल वाळके यांनी उपस्थित केला. आज ज्या रस्त्यांवरील खड्डे दाखवून राजकारण केले जात आहे, त्यातील अनेक रस्त्यांची अवस्था त्यांच्या कार्यकाळातही सुधारली नाही. मग त्यावेळी जनतेला हिशोब देण्याची जबाबदारी नव्हती का, असा प्रश्न त्यांनी केला.
दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्या कार्यकाळातील २२ महिन्यांत अनेक वर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दावा वाळके यांनी केला. १९९६ पासून रखडलेल्या घोडगे-सोनवडे घाटमार्गाच्या प्रश्नाला गती मिळत असून विविध विकासकामांसाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
“निधीचा हिशोब मागायचाच असेल तर मागील दहा वर्षांचा आणि मागील २२ महिन्यांचाही हिशोब जनतेसमोर ठेवा. हिशोब एकतर्फी नको, दोन्ही काळाचा असावा,” असे वाळके यांनी स्पष्ट केले.
जनता सुज्ञ असून रीलमधील राजकीय अभिनय आणि प्रत्यक्षातील विकासकामांसाठीचा पाठपुरावा यातील फरक जनतेला कळतो, असा दावा करत वाळके यांनी “२२ महिन्यांचा हिशोब आम्ही देऊच; मात्र आधी दहा वर्षांचा हिशोब देण्याची तयारी आहे का?” असा सवाल वैभव नाईक यांना केला.
