वृक्षसंवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांकडून पर्यावरण जनजागृती..
⚡सावंतवाडी ता.२८-: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील कल्पवृक्षाला राखी बांधून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
‘वृक्ष हेच जीवन’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्षांप्रती आपुलकी व्यक्त केली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून अधोरेखित केले. रक्षाबंधनाच्या माध्यमातून निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.
यावेळी वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुरु गावकर, पालक कविता हरमलकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सरपंच गुणाजी गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून वृक्षसंवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
