कणकवली पोलिसांचा अनोखा उपक्रम:रक्षाबंधनानिमित्त वाहनचालकांना गुलाबपुष्प देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन..
⚡कणकवली ता.२८-: रक्षाबंधनाच्या निमित्ताने कणकवली पोलिसांच्या वतीने ‘सुरक्षा राखी’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई न करता त्यांच्या हातावर सुरक्षा राखी बांधून गुलाबपुष्प देण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या उपस्थितीत पटवर्धन चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पोलिसांनी वाहनचालकांशी संवाद साधत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या भावनेचा सण आहे. याच भावनेतून ‘सुरक्षा राखी’च्या माध्यमातून वाहनचालकांनी स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपावी, असा संदेश पोलिसांनी दिला.
वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, मोबाईलचा वापर टाळणे तसेच वाहतूक नियमांचे पालन करणे याबाबत पोलिसांनी जनजागृती केली. दंडात्मक कारवाईपेक्षा प्रेमाने आणि आपुलकीने दिलेला सुरक्षा संदेश वाहनचालकांनीही सकारात्मकपणे स्वीकारला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने कणकवली पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणारा ठरला.
