लाल दगडाच्या उत्खननामुळे नैसर्गिक झरे व पाण्याचे स्रोत दूषित होत असल्याचा आरोप;
प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत संताप
मालवण, दि. प्रतिनिधी :
कुडोपी गाव व परिसरात सुरू असलेल्या लाल दगडाच्या उत्खननामुळे नैसर्गिक झरे, विहिरी तसेच अन्य जलस्रोत बाधित होत असून पाणी दूषित होत असल्याचा आरोप कुडोपी ग्रामस्थांनी केला आहे. त्यातच खाणीवर काम करणारे कामगार उघड्यावर शौचास जात असल्याने पावसाच्या पाण्यासोबत ही घाण जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन तसेच उपोषण करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. येत्या चार दिवसांत या प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कुडोपी गाव व परिसरात मोठ्या प्रमाणात लाल दगडाचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक झरे, विहिरी आणि इतर जलस्रोतांवर विपरीत परिणाम होत असून पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून गावाला पाणीपुरवठा करणारे नैसर्गिक झरे आणि जलस्रोत ग्रामस्थांसाठी जीवनदायी आहेत. मात्र उत्खननामुळे या जलस्रोतांचे पाणी दूषित होत असल्याने त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप करण्यात आला.
खाणीतील मातीमिश्रित पाणी वाहून नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मिसळत आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असून ग्रामस्थ सातत्याने आजारी पडत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. तसेच खाणीवर काम करणारे कामगार उघड्यावर शौचास बसत असल्याने पावसाळ्यात ही घाण वाहून जलस्रोतांमध्ये मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गावातील पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जलस्रोतांचे नुकसान होत असल्यास लाल दगडाचे उत्खनन तातडीने थांबवून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा येत्या चार दिवसांत उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
यावेळी प्रशांत पडवळ, गुरुप्रसाद मयेकर, हेमंत पडवळ, राजेंद्र हिर्लेकर, बाळकृष्ण पडवळ, विजय वाळवे, दिनानाथ पडवळ, दत्ताराम वाळवे, गणेश वाळवे, शशिकांत वाळवे, नंदकुमार पडवळ, सचिन पडवळ, राजाराम पाटणकर, प्रवीण मुणगेकर, गणपत घाडी, गौरव अपराज, मोहन वाळवे, दिनेश वाळवे, दशरथ वाळवे, अनिल वरक, श्लोक घाडी, संतोष वाळवे, दीपक शेळके, अनिल हिर्लेकर, समीर हिर्लेकर, शंकर हिर्लेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
